राम गणेश गडकरी यांचे खलनायक
गडकरयांची एकूण नाटके सात. त्यापैकी तीन अपूर्ण राहिली आणि चारच ते पूर्ण करू शकले. एकच प्याला, भावबंधन, प्रेमसंन्यास आणि पुण्यप्रभाव ही ती चार नाटके होत. हे आता वेगळे सांगायला नको. हे अनेकदा चर्चिले गेले आहे. फक्त विषयाची मांडणी करण्यासाठी मी त्याची पुनरोक्ती केली एवढेच!
ह्या चारही नाटकांतून गडकरयांनी समाजसुधारणेचा विषय हाताळला आहे. "सामाजिक प्रश्न स्पर्शिल्याशिवाय नाटक जनमानसाची पकड घेणार नाही असे गडकरयांना वाटत असावे म्हणूनच गडकरयांनी हा विषय घेतला". असे टीकाकार म्हणतात. सुधारणेच्या नावाखाली समाजात त्यावेळी जी वैचारिक विकृती होती त्याची मार्मिक टवाळी गडकरयांनी केली आहे. पुराणमतवादी तत्वे आणि सुधारणावादी तत्वे या दोन्हीतील वैगुण्ये गडकरयांनी त्यांत दाखविली आहेत. पण तरीही समाजसुधारणेबद्दल त्यांना वाटणारा जिव्हाळा या नाटकांतून स्पष्ट होतो. पण त्यामुळे झाले असे की गडकरयांच्या प्रेमसंन्यास व पुण्यप्रभाव या दोन्ही नाटकांची मांडणी सारखी आली. प्रेमसंन्यास नाटक बालविधवांच्या जीवनाभोवती लिहून पुनर्विवाहाचा पुरस्कार केला आहे, तर पुण्यप्रभावात प्रेमविवाहाचा. एकच प्याला हे संपूर्ण दारूच्या दुष्परिणामांना वाहिलेले नाटक आहे. भावबंधन मात्र कोणत्याही विषयावर फारसे प्रतिपादन करीत नाही.
प्रत्येक नाटकांत गडकरयांनी पात्र योजना सढळ हाताने केलेली दिसते. पण अनेक पात्रांचा गोतावळा सोडून आपण आता त्यांच्या खलनायकांकडे वळू.
कमलाकर (प्रेमसंन्यास - १९१३)
बाबासाहेबांच्या दोन मुली सुशीला व लीला या विधवा आहेत. तसेच तात्यासाहेबांची द्रुमन ही बालविधवा आहे आणि वीणा अजून अविवाहित आहे. या चारही तरुण मुलींबरोबर जयंत व कमलाकर यांची रोजची उठ-बस आहे. कारण ते लहानपणापासून बरोबर वाढले आहेत. कमलाकर हा लीलेच्या मागे आहे. जयंत ची बायको कजाग निघाल्यामुळे जयंतचा सुद्धा लीलेकडे ओढा आहे. या स्त्री-वर्गावर छाप पाडण्यांत कमलाकर प्रथमपासूनच कमी पडत आला आहे. याची सूक्ष्म कळ त्याच्या मनांत सलत आहे. नाटकाच्या पहिल्या अंकाच्या पहिल्या प्रवेशाच्या शेवटी त्याच्या स्वगतावरून हे निदर्शनास येते. (जागेअभावी हे स्वगत येथे उद्धृत करता येत नाही, क्षमस्व)
कमलाकर हा मुळांत दुष्ट-बुद्धीचा आहे. त्याचे विचार विकृत आहेत. त्याला कुठलीही गोष्ट चांगली दिसत नाही. निसर्गाकडे सुद्धा तो विकृत दृष्टीने पाहतो. स्त्रियांबद्दल त्याचे विचार पापी आहेत.
"गगनमार्ग चालण्याच्या श्रमाने उरी फुटल्यामुळे सूर्याने रक्ताची गुळणी टाकून नुकताच प्राण सोडला आहे. रक्ताने माखलेल्या या त्याच्या मृत्युशय्येवर हा सोसाट्याचा वारा ढगाचा शेणगोळा फिरवीत आहे. इकडे मरता मरता सूर्याने मारलेल्या हृदयभेदक भाल्यांनी झालेली इंद्रधनुष्याची जखम अजून पुरतीशी भरून आली नाही म्हणून हे कृष्णमेघ थोडे अश्रू गळीत आहेत....." हे कमलाकरने केलेले पावसाळी तिन्हीसांजेचे वर्णन किती भयानक आहे!! गडकरी जसे जयंत-लीला कडून नाजूक प्रेम-संवाद वदवू शकतात तसेच इतके भयंकर सुद्धा लिहितात हे प्रत्यक्ष वाचल्याशिवाय खरे वाटत नाही. पहिल्या अंकाच्या शेवटी लीला आपल्याला मिळण्याच्या अशक्यतेची जेव्हा कमलाकरला खात्री पटते तेव्हा तो कपट-कारस्थाने आखायला सुरुवात करतो.
हे नाटक एक शोकांतिका आहे. लीलेला कमलाकर विष देऊन मारतो. जयंत स्मशानांत लीलेच्या जळत्या चितेसमोर हृदयद्रावक शब्दांत आपली भावना प्रकट करतो. या सामाजिक खेळाचे नांवच प्रेमसंन्यास.
वृंदावन (पुण्यप्रभाव - १९१६)
पुण्यप्रभाव मध्ये सुद्धा गडकरयांनी पात्रांची खैरात केली आहे. मुख्य पात्रे चारच. वसुंधरा, भूपाल, वृंदावन व कालिंदी. वृंदावन हा नालायक पण भेकड स्वभावाचा आहे. तो राज्यांतला एक श्रेष्ठ अधिकारी आहे. त्याला त्याच्यापेक्षा पुष्कळ कनिष्ठ दर्जाचा कंकण सांगतो की "(तुमच्या बायकोची) निष्ठा आपल्या या एकनिष्ठ सेवकाच्या ठिकाणी जरा चळली आहे" त्यावेळी कंकणच्या मुस्कटात भडकावण्याऐवजी वृंदावन फक्त हंसतो. इथे त्याची बेशरमी दिसते.
वसुंधरा आपल्याला मिळू शकत नाही हे दिसल्यावर वृंदावन वसुंधरेला भ्रष्ट करण्याच्या कारस्थानासाठी कालिंदीशी लग्न करतो. ज्यावेळी कालिंदीला त्याच्या कपटाचा नुसता संशय येतो त्यावेळी "डोळ्यांच्या खाचा करून तुझ्या पंचप्राणांना त्यांत गाडून टाकीन. ... माझ्या इछेच्या आड आलीस तर एका क्षणांत तुझा प्राण घेऊन मोकळा होईन" अशी धमकी देतो. त्याच्यावर नितांत प्रेम करण्याऱ्या पतिव्रता कालिंदीला "एक दीड दमडीची रांड" म्हणतो. एवढी अभद्र भाषा गडकरयांनी वृंदावनच्य तोंडी टाकावी हे आश्चर्यच होय! हाच वृंदावन आपल्या कपट कारस्थानाची कल्पना असल्यामुळे भूपालला तोंड दाखवायला शरमतो. त्याला चुकवून वसुंधरेला भेटायला अंधाऱ्या तळघरात जातो तेंव्हा तिच्याशी बोलताना अडखळतो, तिच्याकडे बघण्याचे टाळतो. पण तोच वृंदावन पुढे वसुंधरेच्या समोर दिनारच्या पोटांत कट्यार खुपसून त्याचा (वास्तवांत नकळत केतनचा) वध करतो.
एकीकडे भेकड, भित्रा, कचखाऊ वृंदावन एका अर्भकाची हत्या करतो हे अविश्वसनीय वाटते. त्याच्या वर्तनांत एकसूत्रता दिसत नाही. रा. शं. वाळिंबे वृंदावनला "तो मुळात सत्प्रवृत्त आहे" म्हणतात. पण एवढा दुष्प्रवृत्ती करणारा वृंदावन सत्प्रवृत्त असुंच शकत नाही!! वृंदावनाला रेखाटताना प्रत्यक्ष गडकरयांचा सुद्धा गोंधळ उडाला असावा असे टीकाकार म्हणतात.
तळीराम (एकच प्याला - १९१७)
तळीरामाबद्दल काय लिहावे! खरं तर एकच प्यालाचा खलपुरूष फक्त तळीराम नाही. त्याच्या जोडीला सुधाकाराचा स्वाभिमानी आणि अतिरेकी स्वभाव, त्याची कोर्टातली मानहानी, सिंधूच्या पातिव्रत्याचा अतिरेक व, सर्वात शेवटी, दारूचे व्यसन हे सुद्धा आहेत. पण ह्या सगळ्या अव्यक्त गोष्टी आहेत. व्यक्तीनिष्ठ विचार करायचा झाल्यास तळीरामाला खलनायक म्हणता येईल. कारण तोच सुधाकराला दारू पिण्यास प्रवृत्त करतो!
तळीराम स्वतः मुळात दारूबाज! पण अतिशय बुद्धिमान! प्रत्येक बाबतींतला त्याचा तुलनात्मक युक्तिवाद, भाषा, एखादी गोष्ट पटवून देण्याची खुबी अवर्णनीय आहे. अर्थात गडकरयांच्या नाटकांत क्वचितच असे पात्र असेल की त्याचे संवाद पल्लेदार नाहीत. भगीरथाला "दारू ही काय चीज आहे" हे पटवून देताना तळीरामाने सांगितलेली उदाहरणे अप्रतिम आहेत.
"प्रेमापेक्षा मदिरा प्रत्येक बाबतींत श्रेष्ठ आहे. प्रेमांत राजा सुद्धा अगदी गुलाम होतो, पण मदिरेत गुलाम सुद्धा अगदी राजासारखा स्वतंत्र होतो. प्रेम भीक मागायला शिकवतं, तर मदिरेच्या उदारतेला मर्यादा नसते. .... फार कशाला? प्रेमानं फार झालं तर एखादी मदिराक्षी मिळविता येते. पण दारू पिऊन डोळे लाल झाले की स्वतःलाच मदिराक्ष बनता येतं".
"(प्रेमात) दोन जीवांचा एकजीव करण्याचं अर्धमूर्ध काम दारू करत नाही. दारूमुळे आजपर्यंत कैक जीव अजिबात नाहीशे झाले आहेत". या युक्तीवादावरून तळीरामाची बुद्धिमत्ता कळते.
हाच तळीराम पुढे सुधाकराचे रामलाल विरुद्ध कान भरवितो. "तुमची सनद गेली तेंव्हा याने सिंधूला मिठी मारली" असे सुधाकराला सांगतो. कारण दारूमुळे त्याची सद्सद्विवेकबुद्धी नष्ट झाली आहे. आणि बरोबर सुधाकराची सुद्धा.
तळीराम दारूबाज आहे, पण कपटी नाही. सुधाकरच्या मनात विष कालवण्याचे दुष्ट कृत्य त्याच्या कडून गडकरयांनी का करवून घेतले हे उमजत नाही. दारूच्या नशेत तो क्रूर होऊ शकतो. पण दुष्ट नाही. सुधाकराला व्यसनाधीन करण्यामागे त्याचा संसार उध्वस्त करण्याचा तळीरामाचा हेतू असेल असे कुठेच वाटत नाही.
घनश्याम (भावबंधन - १९१९)
भावबंधानाचे सर्व कथानक सदैव घनश्यामाच्या भोवतीच फिरते. नाटकाची सुरुवातच "माझे नांव घनश्याम" या त्याच्या वाक्याने होते. नाटकभर घनश्यामाची कारस्थाने चालतात. शेवटी धुंडिराजच्या चांगुलपणाच्या साक्षात्काराने घनश्यामाची कारस्थाने संपतात. आणि तिथेच नाटकही संपते. मग या घनश्यामाला नाटकाचा नायक का म्हणू नये? पण ...
हा घनश्याम, कितीही साव होण्याचा आव आणला तरी, मुळात नालायक आहे. कपटी आहे. तो धनेश्वरचा मुनीम. धनेश्वर वृद्ध असूनही, आपल्या मुलीच्या मैत्रिणीशी - मालतीशी - लग्न करायला तयार होण्या इतका लंपट आणि पाजी आहे.
घनश्यामच्या मनांत सद्भावना बिलकुल नाही. अत्यंत निर्विकार भावनाशुन्यता, कठोरपणा, जीवनांतल्या उदात्त मूल्यांबद्दलचा तिरस्कार, प्रेमभावनेचा लोप, भयानकतेची लालसा ही त्याची स्वभाववैशिष्ट्ये होत.
"मी तर असा बेपर्वाईने वागणारा. पायांतली वहाण पायातच बाळगणारा व्यवहारी माणूस मी !" हे तोच कबूल करतो. घनश्याम हा आई-बापाविना धनेश्वरच्या तुकड्यांवर पोसलेला. कुटुंबसंस्था, नाती यांवर विश्वास नसलेला घनश्याम आपल्या मुखानेच लतिकेला सांगतो, "काय संबंध दयामाया येण्याचा! कोणी कधी माझ्यावर दयामाया केली म्हणून मोबदल्याखातर मी दुसऱ्यावर दया करू ? टीचभर उघड्यानागड्या देहाच्या देणगीखेरीज मानवजातीने आजवर या एकलकोंड्या घनश्यामावर काय उपकार केले आहेत ? जिथेतिथे मला अनादर, तिरस्कार, सहाय्यशून्यता आणि परकेपणा याचाच अनुभव येत गेला आहे. स्वार्थानपेक्ष, हेतुशून्य दयेचा एक शब्द जर कुणी मला दिला असता तर मी त्याचा सात जन्माचा ऋणी होऊन बसलो असतो".
ज्याच्या अन्नावर घनश्याम पोसला त्या धनेश्वराला पण तितक्याच निर्लज्जपणे ठणकावून सांगतो, "आपण मालतीशी लग्न केलेच पाहिजे". "..कारण ?" "ही माझी इच्छा ! आपल्या लग्नाच्या खटपटीत मी पडलो तो आपल्या थेरड्या षौकासाठी ? मालतीच्या जन्माचा सत्यानाश करायचा हा माझ्या प्रतिज्ञेचा एक भाग आहे. आणि आपल्या लाडक्या लतिकेशी माझे लग्न लावणे हा त्या प्रतिज्ञेचा उत्तरार्ध आहे".
घनश्यामचे मस्तक जितके तल्लख व बुद्धिप्रधान आहे तितकेच त्याचे हृदय भावनाहीन आहे. हे पण नाटककाराने त्याच्याच मुखांतून वदविले आहे. " .... मला मुळी हृदयच उरले नाही. बुद्धिमत्तेच्या विजयांतच सुख मानायची संवय लागल्यामुळे, विचारांप्रमाणेच माझे विकार, इच्छा, भावना यांचा उद्भवही माझ्या बुद्धिप्रधान मस्तकांत होत असतो".
"स्वार्थानपेक्ष, हेतुशून्य दयेचा एक शब्द जर कुणी मला दिला असता तर मी त्याचा सात जन्माचा ऋणी होऊन बसलो असतो" म्हणणाऱ्या घनश्यामावर नाटकाच्या शेवटी धुंडिराज दया दाखवतो. तो काबुलीजाबाबाचा कागद तो फाडून टाकतो व म्हणतो, "पुरावा नष्ट करण्याची शिक्षा भोगायला मी तयार आहे. मुलांना का पुढे करायचे ! अहो घनश्याम झाला तरी तो आमचाच !" धुंडिराजचे हे भाषण ऐकून घनश्यामातला खलनायक संपतो आणि तो लतिकेला म्हणतो, "लतिके, ही खरी दया !"
गडकरयांच्या नाटकांतल्या प्रत्येक पात्रावर खूप काही लिहिता येईल. प्रत्येक पात्रावर अजून अभ्यास होणे आवश्यक आहे. अभ्यासूंनी याचा विचार करावा. खलनायकांवरही इथे खूप लिहायचे होते. पण गडकरयांच्या नाटकांप्रमाणे हे लांबवणे योग्य नव्हे!!
----संदीप विष्णू चित्रे
No comments:
Post a Comment